जखम भाग - १


           इन्स्पेक्टर विजयकुमार सक्सेना यांना अतिशय दगदगीचा काळ सुरू झाला होता.  त्यांच्या एम.आय.डी.सी.  पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये औद्योगिक अशांतता पसरली होती. त्यामुळे ते अतिशय चिंताग्रस्त होते.  चालू असणारी औद्योगिक अशांतता कशाप्रकारे लवकरात लवकर मिटविता येईल  हे ते पाहत होते.  अशा अशांततेच्या वातावरणामध्ये कुठल्याही प्रकारे घातपात,  मारामारी किंवा एखाद्या स्त्रीवर अत्याचार होऊ नये म्हणून ते अतिशय काळजी घेत होते.  त्यांनी फौजदार भोसले, जमादार शिंदे व इतर पोलिसांना त्या विभागात कडक  निगराणी ठेवण्यास सांगितले होते. इन्स्पेक्टर विजयकुमार सक्सेना यांना सुद्धा वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडून त्या विभागात दक्षता घेण्याचे आदेश आले होते. 

           इतर फॅक्टरी पेक्षा सोलापूर डिस्टिलरी प्रायव्हेट लिमिटेड या फॅक्टरीची परिस्थिती अतिशय चिंताजनक होती.  त्या फॅक्टरीत जवळजवळ दोन हजार कामगार वर्ग कामाला होते.  कामगार व मालक यांच्या मध्ये  पगार, सुट्टी व बोनस या कारणाने वातावरण तापले होते. त्या फॅक्टरीचा कामगार युनियन लीडर किरण चौरे व फॅक्टरीचे मालक लालसिंग बलदवा यांच्यामध्ये रोज कामगारांचे पगार,  सुट्टी व बोनस या कारणाने वादावादी होत होती.  तडजोड व्हायला मार्ग निघत नव्हता.  किरण चौरे सुद्धा संप पुकारण्याची धमकी लालसिंग बलदवा यांना देत होता,  अशा प्रकारची तक्रार लालसिंग बलदवा यांनी इन्स्पेक्टर विजयकुमार सक्सेना यांना तोंडी दिली होती. लालसिंग बलदवा हे इन्स्पेक्टर विजयकुमार सक्सेना यांचे जवळचे मित्र होते.  आठवड्यातून एखाद्या वेळेस तरी इन्स्पेक्टर विजयकुमार सक्सेना त्यांना भेटायला फॅक्टरीमध्ये किंवा त्यांच्या घरी जात असत.

          इन्स्पेक्टर विजयकुमार सक्सेना यांनी रात्री दहा वाजेपर्यंत जीपमधून त्या परिसरात गस्त घातली.  नंतर ते फौजदार भोसले व जमादार शिंदें वर जबाबदारी सोपवून व दक्षता घेण्यास सांगून घरी परतले.  घरी आल्यानंतर त्यांनी गडबडीत आपले ड्रेस बदलले आणि पत्नीने वाढलेले गरम -  गरम जेवण पटकन संपवून झोपण्यासाठी म्हणून गादीवर जाऊन पडले.  ते इतके थकले होते की गादीवर पडल्या पडल्या त्यांना झोप लागली. 

          रात्रीचे साडेअकरा वाजले होते, अचानक फोनची घंटी वाजू  लागली.  इन्स्पेक्टर विजयकुमार सक्सेना यांनी पत्नीला रिसिव्हर उचलण्यास झोपेतच सांगितले,  पण ती सुद्धा गाढ झोपी गेली होती.  नाईलाजाने इन्स्पेक्टर विजयकुमार सक्सेना यांनी स्वतः रिसिव्हर उचलून कानाला लावले व नेहमीच्या सवयीप्रमाणे म्हणाले, " हॅलो इन्स्पेक्टर विजयकुमार सक्सेना बोलतो आहे. "  

          पलिकडून आवाज आला,  " साहेब मी फौजदार भोसले बोलतो आहे. " 

           इन्स्पेक्टर विजयकुमार सक्सेना म्हणाले, " काय भोसले,  आता तर तासभर  झाले आहे मी झोपून,  एवढे काय अर्जंट काम निघाले आता ? " 

          फौजदार भोसले म्हणाले, "  साहेब एक अत्यंत वाईट घटना घडली आहे,  म्हणून नाईलाजाने मला तुम्हाला एवढ्या रात्री त्रास द्यावा लागला." 

           वाईट बातमी म्हणताच इन्स्पेक्टर विजयकुमार सक्सेना यांचे  डोळे खाडकन उघडले.  ते लगेच म्हणाले, "  कोणती वाईट बातमी आहे भोसले ? "     

          " सोलापूर डिस्टिलरी प्रायव्हेट लिमिटेड या फॅक्टरी मधील कामगार युनियन लीडर किरण चौरे यांचा खून झाला आहे. " 

"  काय !  हे कसे शक्य आहे ? मी तासाभरापूर्वी तिथे जाऊनच आलो आहे.  हे कारस्थान कोणी केले वगैरे माहित झाले का ? " 

          " होय साहेब. " 

          "  कोण आहे तो हरामखोर ? "

          "  फॅक्टरीचे मालक लालसिंग बलदवा. "

           " काय  बरळत आहात भोसले तुम्ही ? "

           " साहेब जे खरे आहे तेच मी तुम्हाला सांगतो आहे . संबंधित घटनास्थळी लालसिंग बलदवा यांना पुराव्यासहित पकडले आहे व तेथील कित्येक कामगार सुद्धा आय विटनेस आहेत. " 

          " ठीक आहे भोसले.  तुम्ही ताबडतोब ॲम्बुलन्स, फोटोग्राफर व ठसे तज्ञांना फोन करून बोलावून घ्या.  मी तेथे लगेच येऊन पोहोचतो. "

          इन्स्पेक्टर विजयकुमार सक्सेना यांनी रिसीव्हर खाली ठेवला व युनिफॉर्म अंगावर चढवून जिपने  सोलापूर डिस्टिलरी प्रायव्हेट लिमिटेड मध्ये येऊन पोहोचले.  फौजदार भोसले, जमादार शिंदे व इतर कॉन्स्टेबल त्यांचीच वाट पाहत उभे होते. फौजदार भोसले यांनी लगेचच त्यांना गर्दीमधून वाट काढत मृतदेहाजवळ नेले. इन्स्पेक्टर विजयकुमार सक्सेना यांनी मृतदेहाचे जवळून निरीक्षण केले.  कामगार युनियन लीडर किरण चौरे यांचा अंत अत्यंत भयावह असा झाला होता.  त्यांना इमारतीच्या दुसर्‍या मजल्यावरून ढकलून दिल्यामुळे,  त्यांचे डोके फुटले होते व शरीरामधील रक्त अनेक ठिकाणाहून बाहेर आले होते आणि खाली जमिनीवर पसरले होते. 

          इन्स्पेक्टर विजयकुमार सक्सेना यांचे निरीक्षण पूर्ण झाल्यावर काही मिनिटात ॲम्बुलन्स, फोटोग्राफर व ठसे तज्ञ आले.  इन्स्पेक्टर विजयकुमार सक्सेना यांनी दिलेल्या सूचनेनुसार फोटो ग्राफर यांनी वेगवेगळ्या अँगलमधून मृतदेहाचे फोटो काढले.  तसेच ठसे तज्ञांनी संशयित ठिकाणी ठसे सापडतात का ते पाहिले.  त्यांचे काम पूर्ण झाल्यावर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ॲम्बुलन्स मधून छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयांमध्ये पाठविण्यात आले. इन्स्पेक्टर विजयकुमार  सक्सेना यांनी फौजदार भोसले व जमादार शिंदे यांना लालसिंग बलदवा यांना पोलीस स्टेशन मध्ये नेऊन कोठडीमध्ये ठेवण्यास सांगितले.  त्यांच्या म्हणण्यानुसार लालसिंग यांना घेऊन फौजदार भोसले व जमादार शिंदे पोलिस स्टेशनला निघून गेले.  त्यानंतर इन्स्पेक्टर विजयकुमार सक्सेना यांनी एक खुर्ची मागवली  व त्यावर ते बसले. त्यांनी या घटनेची माहिती ज्यांना आहे त्यांच्याकडे प्राथमिक चौकशी करण्याचे ठरवले.  त्यानुसार प्रथम तेथील मुनीम  यांना बोलावले व म्हणाले,"  तुम्ही येथील मुनीम आहात काय ? "

          "  हो साहेब. " तो मनुष्य म्हणाला.

          "  नाव काय आहे तुमचं ?"

          " प्रेमकुमार घाटे. " 

           "  तुम्ही एक काम करा,  येथील सर्व कामगारांना बोलवा आणि एकेकाला माझ्याकडे पाठवून द्या.  मी त्यांच्याकडे काही चौकशी करणार आहे. " 

           " ठीक आहे साहेब. " 

           इन्स्पेक्टर विजयकुमार सक्सेना यांनी सगळ्या स्त्री व पुरुष कामगारांकडे त्या खूना  संबंधी चौकशी केली. पण कोणाकडूनही त्यांना समाधानकारक अशी माहिती मिळाली नाही.  ते खुर्चीवरून उठले व जेथून किरण चौरे यांना  ढकलण्यात आले होते तेथे इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर जाऊन पाहणी केली.  त्यानंतर तेथून पायर्‍या उतरत असताना त्यांना एका पायरीवर रक्त सांडलेले दिसले. त्यांनी ते रक्त एका बाटलीत घेतले व  कॉन्स्टेबलच्या हातात देऊन परीक्षणासाठी पाठवले.  नंतर ते जाण्यासाठी म्हणून जिप मध्ये जाऊन बसले,  तोच मागून पळत -  पळत मुनीम प्रेम कुमार घाटे आले. इन्स्पेक्टर विजयकुमार सक्सेना त्यांना म्हणाले, "  सांगा काय सांगायचे आहे ? " 

          " साहेब आमच्या मालकांनी किरण चौरेला औद्योगिक वादविवादातून मारले आहे असे मला वाटत नाही."

          " म्हणजे नक्की काय म्हणायचं आहे तुम्हाला ? "

          "  साहेब किरण चौरे व आमचे मालक लालसिंग बलदवा यांची मुलगी स्मिता  यांचे एकमेकांवर प्रेम होते. "  

          " काय ? "  पण एका मिल मालकाची मुलगी कामगार युनियन लीडर वर प्रेम कसे काय केली ? "         

          " साहेब किरण चौरे तसा हुशार होता. त्याचे एम.एस.सी.  पर्यंत शिक्षण झाले आहे. त्यांची घरची परिस्थिती ठीक नसल्यामुळे तो नाईलाजाने आमच्या फॅक्टरीमध्ये कामाला आला होता. "

           " एकुण लफडं असा आहे तर " 

          " ठीक आहे प्रेमकुमार घाटे काही गरज भासल्यास मी तुम्हाला पुन्हा भेटेन. " 

          एवढे बोलून इन्स्पेक्टर विजयकुमार सक्सेना जीप चालू करून पोलीस स्टेशन कडे गेले.  

          इन्स्पेक्टर विजयकुमार सक्सेना पोलीस स्टेशन मध्ये येऊन आपल्या खुर्चीवर बसले. त्यानंतर त्यांनी फौजदार भोसले व जमादार शिंदे यांच्याशी झालेल्या खुनाबद्दल चर्चा केली. चर्चा संपल्यानंतर ते लालसिंग बलदवा यांना भेटायला कोठडी कडे गेले.  इन्स्पेक्टर विजयकुमार सक्सेना यांना पाहताच लालसिंग बलदवा दुसरीकडे तोंड फिरवून खाली मान घालून उभे राहिले. 

          इन्स्पेक्टर विजयकुमार सक्सेना म्हणाले,  "  बलदवा शेठजी तुम्ही असे काही कराल यावर विश्वासच बसत नाही. "

           लालसिंग बलदवा म्हणाले,  सक्सेना साहेब,  माझं आयुष्य आता ह्या कोठडीतच जाणार. मी इतक्या मेहनतीने उभा केलेल्या व्यवसायाचं नावलौकिक पार धुळीला मिळालं.  सगळे पुरावे माझ्या विरुद्ध आहेत.  मी एक खूनी  म्हणून आता मला शिक्षा होणार.  तुम्ही माझे मित्र आहात.  मी तुमची शपथ घेऊन सांगतो,  मी निर्दोष आहे.  मी किरण चौरेला मारलो नाही.  कसंही करून मला येथून सोडवा.  मी तुमच्या पाया पडतो. "

          " बलदवा शेठजी, सर्व पुरावे तुमच्याविरुद्ध आहेत,  यात तिळमात्र सुद्धा शंका राहिलेली नाही.  जेव्हा किरण चौरे वरून पडले, तेव्हा तेथे दुसऱ्या मजल्यावर आपल्या व्यतिरिक्त कोणीच नव्हते.  त्यांंच्या हातामध्ये कामगारांच्या मागण्यांची व इतर महत्त्वाच्या कागदपत्रांची फाईल होती.  याशिवाय किरण चौरेंचे तुमच्या मुलीबरोबर प्रेम संबंध होते.  यावरून तुमच्या शिवाय त्याला दुसरा कोणी मारू शकत नाही,  असा सर्वांचा तर्क सुद्धा झाला आहे."

          " आता मला शिक्षा होणार,  असं मला खात्रीने वाटत आहे. माझ्या सगळ्या इच्छा आकांक्षा पार धुळीला मिळाल्या आहेत. " 

           हे बघा शेठजी, उगीच डोकं खराब करून घेऊ नका तुम्ही. कृपया करून मला सर्व काही खरं सांगा. "       

          " आता मला फाशी किंवा जन्मठेपेची शिक्षा होणार हेच खरं आहे.  माझ्या जीवनात आता काळोख पसरला आहे.  सक्सेना साहेब,  माझी तुमच्याजवळ एक विनंती आहे. " 

          "  असं का बोलत आहात शेठजी  तुम्ही.  सांगा काय विनंती आहे. "  

          " कृपा करून मला मारहाण करू नका. " 

          "  हे बघा शेठजी,  तुम्ही उगीच घाबरत आहात.  मी तुम्हाला शाश्वती देतो,  तुमच्या अंगाला सुद्धा कोणी हात लावणार नाही. मला फक्त एकाच गोष्टीचे दुःख वाटत आहे, ते म्हणजे मी तुम्हाला जामिनावर सुद्धा सोडू शकत नाही.  एक मित्र म्हणून मला क्षमा करा.  कायद्याने माझे हात बांधले गेलेले आहेत.  मी कायदा ओलांडू शकत नाही. " 

          " मी समजू शकतो सक्सेना साहेब." 

          " शेठजी, मी फौजदार भोसले व जमादार शिंदे यांना सांगून ठेवतो.  तुम्हाला येथे कसल्याही प्रकारचा त्रास होणार नाही.  तुम्ही घरून डबा मागवून जेवण करू शकता. " 

          "  धन्यवाद सक्सेना साहेब. "

          " इन्स्पेक्टर विजयकुमार सक्सेना परत आपल्या केबिनमध्ये आले.  तेथे फौजदार भोसले व जमादार शिंदे बसले होते. इन्स्पेक्टर विजयकुमार सक्सेना म्हणाले, "  भोसले तुम्हाला काय वाटतं लालसिंग बलदवा यांनीच किरण चौरे यांना दुसऱ्या मजल्यावरून ढकलून दिले  आहे. " 

          फौजदार भोसले म्हणाले, होय साहेब,  कारण तसे पुरावे सुद्धा आपल्यासमोर उपलब्ध आहेत. "   

          " भोसले, तुम्ही इकडे आल्यानंतर मी  इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर गेलो होतो.  तेथे मला एका पायरीवर रक्त सांडलेले दिसले.  मी ते रक्त किरण चौरे यांचेच आहे का ?  हे पाहण्यासाठी परीक्षणासाठी पाठवून दिले आहे.  पण माझ्या मनात एक शंका  आहे,  जर किरण चौरेंना ढकलून  मारण्यात आले आहे , तर मग तेथे पायरीवर पडलेले रक्त कोणाचे आहे ? "     

          जमादार शिंदे म्हणाले, "  खरोखरच अत्यंत गुंतागुंतीची गोष्ट आहे ही.  माझं डोकं तर चालेनासं झालं आहे साहेब. " 

इन्स्पेक्टर विजयकुमार सक्सेना म्हणाले, "  उत्तरीय  तपासणीचा व पायरीवर सांडलेल्या  रक्ताचा रिपोर्ट काय सांगतो यावरूनच आपल्याला पुढची दिशा ठरविता येईल.  दोन्ही रिपोर्ट येईपर्यंत वाट पाहण्याशिवाय आपल्याकडे दुसरा मार्ग नाही. 

                                                      क्रमशः


Comments

Popular posts from this blog

आजचे मंत्रीमंडळ निर्णय (२८ जून २०२३)

पुणे येथे ४ अतिरिक्त कौटुंबिक न्यायालये स्थापन करण्याबाबत मान्यता, व त्याकरिता ३६ पदांना मान्यता.